“वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे !
पक्षीही सुस्वरे आळविती !!”
संत तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणे , देलवडी गावाच्या पश्चिमेला वनखात्याच्या ६ एकर जमिनीवर अक्षरश: ६०० देशी झाडांचे नंदनवन फुलले आहे.एप्रिल २०२१ मध्ये केडगाव येथील ‘एक मित्र एक वृक्ष’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी देलवडी गावांमध्ये आईचं बन करण्याची कल्पना पत्रकार प्रकाश शेलार यांच्याकडे मांडली. शेलार यांनी सर्वप्रथम ग्रामपंचायत देलवडीला विश्वासात घेतले. उपक्रमानिमीत्त देलवडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत एकत्र आणले. शिक्षक मित्र महादेव शेलार गुरुजी यांनी नोकरवर्ग असणाऱ्या अनिवासी देलवडीकरांची
एकत्रित येण्यासाठी मोट बांधली.सर्वांनी मिळून जागेची निवड केली.या कामी वनाधिकारी गोविंद केंद्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.देलवडी गावाच्या पश्चिमेला ६ एकर वनखात्याची जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून दिली.माणसाच्या जीवनातील सर्वात प्रिय व्यक्ती आई असते ,म्हणून आईच्या नावाने प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने झाड लावण्याचे ठरवले. म्हणून या प्रकल्पाला ‘आईचं बन ‘नाव देण्याचे ठरले.
त्यानंतर ‘मदर्स डे’ च्या मुहूर्तावर ग्रामस्थांची बैठक झाली. ठेकेदार दत्तात्रय अशोक शेलार यांनी झाडांसाठी मोफत पाणी दिले. इंजिनीयर भाऊसाहेब शेलार,अशोक चांदगुडे, प्रवीण शिर्के, योगेश जाधव व नामदेव शेलार यांनी आईचा बनचा आराखडा तयार केला.या बनामध्ये वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, नाना नानी पार्क, फुलांचा बगिचा आरक्षित करण्यात आले.या उपक्रमासाठी दिवसभर खुरपणी करणाऱ्या महिलेपासून जगाची आर्थिक राजधानी अमेरिका येथे काम करणाऱ्या देलवडीकर इंजिनियरपर्यंत प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले. या उपक्रमासाठी देलवडीकरांनी मिळून तब्बल ४ लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली. फक्त झाडांसाठी लोकवर्गणी ४ लाख रुपये जमा करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणावे लागेल.या बनासाठी ग्रामपंचायत देलवडीने मोफत खड्डे खोदून दिले. वृक्षारोपणाचा शुभारंभ सरपंच निलमताई काटे, बाजार समितीचे संचालक शिवाजी आप्पा वाघोले, भीमा पाटसचे संचालक विकास भाऊ शेलार यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला. वृक्षारोपणासाठी गावातील शिलेदार टिमच्या ४० युवकांनी सलग महिनाभर श्रमदान केले. पालनकर्ते ग्रुपच्या माध्यमातून प्रतिमहिना वर्गणी जमा करून या झाडांचे संरक्षण केले जाते.बनामध्ये ६०० व रस्त्याच्या दुतर्फा १०० झाडे, जुन २०२१ मध्ये लावण्यात आली.या उपक्रमाची दखल महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांनी घेतली. सकाळ ,लोकमत, पुढारी, पुण्यनगरी, प्रभात या वृत्तपत्रांनी या प्रकल्पाला प्रसिद्धी दिली. तर महाराष्ट्रातील प्रसिद्धध वृत्तवाहिन्या एबीपी माझा, न्यूज एटीन लोकमत या वृत्तवाहिन्यांनी सुमारे तीन ते पाच मिनिटाची स्टोरी टीव्हीवर दाखवली. देलवडी गाव प्रथमच इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये झळकण्याचे भाग्य ‘आईचं बन’ या उपक्रमामुळे लाभले. या उपक्रमामुळे गावातील सुशिक्षित युवक एकत्र झाले. भविष्यामध्ये वाचनालय , वेबसाईट निर्मिती, मल्हार नगरीचे सुपुत्र पुस्तक निर्मिती, व्याख्यानमाला याची प्रेरणा या आईचं बन या उपक्रमापासून मिळाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.