खंडोबा देवाचे मंदिर पुरातन असून हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराला एकशे एक शिखरे आहेत. नयनरम्य असे मल्हारी मार्तंड श्री खंडोबा, म्हाळसाकांत, बानाई यांचे देवस्थान असून जेजुरी या ठिकाणी आल्याचा भास होतो यामुळे याला प्रति जेजुरी असे म्हटले जाते. हे मंदिर छोट्या टेकडीवर असून मंदिराभोवती अंदाजे सुमारे ५०० फूट लांब १७० फूट रुंद व १८ फुट उंच चिरेबंदी दगडी परकोट आहे. परकोटाच्या ३ दिशांना प्रवेशद्वार आहेत. एक दक्षिण,उत्तरेला व मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. दिपमाळ मंदिरासमोर एक व मंदिराच्या दोन्ही बाजूला एक अश्या तीन मोठ्या दिपमाळा आहेत. मंदिराभोवती वृक्षारोपनही करण्यात अाले अाहे. मुख्य प्रवेशद्वावर १५ फूट लांब व १० फूट रुंद असा नगारखाना आहे या नगारखान्यात सकाळ व सायंकाळी असे नगारा, चौघडा वाजविण्यात येतो. मंदिरामध्ये सुंदर असे कोरीव काम असून गाभार्यामध्ये गेल्यानंतर प्रथमदर्शणी नजरेस पडतात त्या दोन्ही बाजूला जुन्या दगडी बांधकामातील खोली आहे डाव्या बाजूला खोलीमध्ये देवांना विश्रांतीसाठीची जागा आहे. तसेच दोन्ही बाजूला दगडामध्ये अप्रतिम कोरीव घोड्याची मूर्ती पहावयास मिळाल्या. गाभार्यातील प्रवेश द्वारावर मध्यस्थानी गणपती व दगडामधील अप्रतिम कोरीव काम, नक्षीदार फुले पहावयास मिळाली यावरुन खुप जुने मंदिर असल्याचे समजते. यानंतर मल्हारी मार्तंड श्री खंडोबा, म्हाळसाकांत, बानाई दर्शन घेतले. मंदिराच्या पाठीमागे म्हाळसाचे मंदिर अाहे. तसेच उत्तरेच्या प्रवेश द्वाराजवळ एक मोठा चौथरा असून या ठिकाणी याञेमधील तमाशा ठेवला जातो.
देलवडीनजीक वांझरवाडी येथील एका माऊलीस पुञप्रात्पी झाली हा पुञ राञी खंडोबाच्या भेटिला जेजुरी येथे १८ कोस दूर पायी जात असे व देवाचे दर्शन घेत असे कित्येक वर्षे चालले. एके दिवशी खंडोबा या भोळ्या भक्ताला प्रसन्न झाले आणि विचारले ‘तू एवढी सेवा करतोस तुला काय वरदान पाहिजे ते बोल’ तेव्हा या भोळ्या भक्ताने भक्ती करता येईल, असे मागणे सांगितले. देव प्रसन्न झाले, कारण या भक्ताने काहीच मागितले नाही स्वतासाठी. देव लगेच तयार झाले आणि म्हणाले “दिले आवडीने – दे आवडी” ती हि देलवडी झाली. तेथून पुढे खंडोबा देव, बानाई, म्हाळसा, हेगडी प्रधान मनिमल्ल, गजानन गणपती, कार्तिक स्वामी, वीरभद्र यशभंतराव गडाचे राखणदार अशी भक्ती मंडळी मोठ्या आनंदाने देलवडी गडावर राहू लागली अशी आख्यायिका आहे. मंदिराची दैनंदिन पूजा, स्वच्छता वंशपरंपरेने शिर्के परिवार करतात.
या देवाच्या याञेत अगोदर देवाची घटस्थापना होते. मार्गशीर्ष शु. १ ला घटस्थापना होते. नंतर याञेच्या आदल्या दिवशी तेलहंडा हा देवाचा कार्यक्रम राञी असतो . तांदळाला तेलाने अंघोळ घालतात. संपूर्ण गाव तेल हंड्यात घालतात. देवाचा मुख्य याञेचा दिवस पहाटे चार वाजता देवाची महापूजा व महाभिषेक होतो.प्रसन्न व आनंदी वातावरणात याञेची सुरुवात होते. याञेच्या दिवशी ९ वाजता देवाची तळीभंडार होते. यावेळी गावोगावचे वाघ्या-मुरळी येऊन मंदिरावर आपली कला सादर करतात. यावेळी देवाचा आवडीचा नैवेद्य हा भाजी भाकरी व कांद्याची पात वांग्याचे भरीत, पुरण पोळीचा नैवेद्य देवास दाखवितात. घटस्थापनेपासून धरलेले उपवास ग्रामस्थ सोडतात. पहिल्या दिवशी भक्त वाजतगाजत देवाला दंडवत घालतात. देवाला ग्रामस्थांतर्फे पोशाख परिधान करतात. तसेच एकेरीवाडी ग्रामस्थांतर्फे सुद्धा पोशाख देवाला परिधान केला जातो. संपुर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केली जाते. मंदिर खुप आकर्षित दिसते. दिवसभर भक्त भंडारा खोबर्याची उधळण करतात. संध्याकाळी देवाचा छबिना निघतो. देवाची पालखी आवळण्याच काम गावातील बलुतेमंडळ मोठ्या भक्तिभावाने करतात. तसेच पालखी ग्रामप्रदक्षिणासुद्धा ग्रामस्थ बलुतेमंडळ करतात. संध्याकाळी शोभेचे दारुकाम, विविधरंगी आकर्षक दारुकाम होते व नंतर लोकनाट्य तमाशा सुरु होतो अश्या प्रकारे पहिल्या दिवसाची सांगता होते.
याञेच्या दुसर्या दिवशी सकाळी ९ वाजता तमाशा हजेरीचा कार्यक्रम होतो. वाघ्या-मुरळी यांच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रशाने संपूर्ण गाव मंदिर दुमदुमून जाते. याञेला मिठाईवाले, पाहुणे मंडळी, दुकाने, पाळणे, फुलवाले इ गावामध्ये याञेचे उत्साही वातावरण होते. चार वाजता पैलवानासाठी कुस्त्यांचे आखाडे होतात यानंतर याञेची सांगता होते.
देलवडीमध्ये वांझरे कुटुंबाला खंडोबा देवाच्या भक्तीचा मान आहे. तसेच देलवडी गावात रासाई देवीची काठी अाहे याचा मान शेलार यांना आहे. देलवडी गावाला मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास लाभला आहे. देलवडीमधील मुळ घराण्यांपैकी टकले एक घराणे पाणिपतच्या तिसर्या युद्धात या घराण्यातील कर्ते कामी आले होते. त्याच बरोबर याच घराण्याकडे महसूल वसूलीचे अधिकार होते. महसूल इंदौर राज्याच्या तिजोरीत जमा होत असे. टकले घराण्याला पुर्वी हत्ती पालखीचा मान होता. आजही हत्तीबारव व हत्तीची समाधी पहावयास मिळते असे सांगण्यात आले. देलवडी मध्ये वाघोले घराण्याकडे पाटिलकी होती. त्याच बरोबर कै. पोपट दादा वाघोले यांच्या प्रयन्तातून खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धारही झाला आहे.
देलवडी गाव हे पर्यटन स्थळ होईलच. या गावाला लाभलेली मुळा-मुठा नदी त्याबरोबरच प्रतिजेजुरी खंडोबाचे अप्रतिम मंदिर, या मंदिरापाठिमागे म्हाळसाचे मंदिर आहे. खंडोबा मंदिराच्या चारही बाजूच्या दगडी बांधकामातील तटबंदी व बाहेरील नदि व मंदिरादरम्यानचा घाट यामुळे निसर्गरम्य वातावरण पहावयास मिळते. या घाटावर काही समाध्या आढळून आल्या आहेत. या शेजारी षटकोनी आकारातील दगडी बांधकातील चौथरे बांधलेले आहेत. थोड्या अंतरावर हेगडी प्रधान व बानुबाईचे सुरेख मंदिर असून या समोर जुन्या जवळपास ६० दगडातील मेंढराच्यामूर्ती असून या ऊन,वारा, पावसामुळे झिज झालेल्या आढळून आल्या त्या मंदिराशेजारी ठेवल्या असून सध्या २१ नवीन छोट्या मेंढरांच्या सिमेंटच्या मूर्ती बसविण्यात आलेल्या आहेत. या मंदिराच्या काही अंतरावर नदिच्या बाजूला शंकराचे छोटे मंदिर आहे. सिमेंटचा बनविलेला घाट रस्ता उतरत असताना दगडी बांधकामातील गणपती, शंकराची मंदिरे दिसुन येतात. घाट उतरल्यानंतर गोल रिंगण आणि लाल मातीमधील कुस्तीसाठी आखाडा बांधण्यात आला असून या शेजारीच वैकुंठ धाम (स्मशानभूमी) आहे. या शेजारी साधारण तीन फुटाचे चौकोनी आकाराचे दगडामध्ये कोरीव काम यावर घुमटागत कोरीव काम करुन यामध्ये मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारची देऊळ जास्त असल्याने देवळाची वाडी संबोधले जायचे मग नंतर देलवडी असे नाव झाले अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या पुर्वेच्या प्रवेशद्वारा समोर हत्तीची मूर्ती आहे. खंडोबा मंदिरासमोर घोड्याची व देवीची मूर्ती आहे. सर्वांनी या दौंड तालुक्यातील प्रतिजेजुरीला नक्की भेट द्या.
येळकोट येळकोट जय मल्हार….