देलवडी या छोट्याशा सुंदर टुमदार गावात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. त्यातच एक मुस्लिम समाज होय. देलवडी गावात वास्तव्यास असणारा हा समाज गावच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक जीवनात समरूप होऊन गेला आहे. देलवडीमध्ये मुस्लिम धर्मियांचे मदिना मस्जिद हे श्रद्धास्थान आहे. त्याचबरोबर हजरत राजा बक्सर रहमतुल्लाह आलै यांचा दर्गा आहे. दर्गा शरीफ हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. मदिना मस्जिदचा इतिहास मुबारकभाई सय्यद व शब्बीरभाई पठाण यांच्या कडून ऐकता येतो. मदिना मस्जिदचे बांधकाम 1984 साली करण्यात आले. सरदारभाई सय्यद यांनी मस्जिदच्या बांधकामात मोठा सहभाग घेतला. आज मस्जिदचे बांधकाम पूर्णपणे आरसीसी मध्ये करण्यात आलेले आहे. शिमगा झाल्यानंतर दर्गा शरीफ या दर्ग्याचा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी शेरा व गलफ दर्ग्यावर वाहिली जातात. मस्जिदमध्ये दिवसातून एकूण पाच वेळा नमाज अदा केली जाते. समाजामध्ये बकरी ईद, रमजान व तिसरा शुक्रवार त्याचबरोबर वर्षाचे इतर बारा सण साजरे केले जातात. मुस्लिम समाजाचे गावच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवनात मोठे योगदान आहे. हा समाज गावचा एक अविभाज्य घटक आहे.